Wednesday, May 14, 2008

का ?

ओणवी झालीस तू हलकेच,
अन देह माझा चांदण्याने झाकला...
आंधळा अंधार मी...माझ्यावारी --
पौर्णिमेचा चंद्र का हा वाकला ?
व्यर्थ वणवणशील तू माझ्यासवे ,
भान याचेही तुला नाही जरा...
मी असा वारा...कुठेही हिंडतो...
शोधसी माझ्यात का तू आसरा ?
जन्म हा साराच काटेरी जरी,
स्पर्श तू केलास अन् झाली फुले...
आग आहे अंतरी; बाहेर ही --
पारिजाताची डहाळी का झुले ?
वेळ भेटीची चुकीची आपली...
वाट आहे वेगळी माझी-तुझी,
जाणिवांना आपल्या सारे दिसे...
प्रीत का ही आंधळी माझी-तुझी ?
मीच माझ्यातून निसटू पाहतो
आणि तू माझ्यात मिसळू पाहसी...
खूप झाले...अर्पिली काही पळे...
जन्म का साराच उधळू पाहसी ?
जाळती आतून- बाहेरून या,
काहिलीच्या, तल्खलीच्या वेदना....
फाटक्या माझ्या जिण्याला ही अशी,
लाभली का भर्जरी संवेदना ?

कवि : प्रदीप कुलकर्णी

No comments:

Post a Comment