Saturday, May 24, 2008


नाते

सारे बिघडल्यासारखे !मोडून पडल्यासारखे !
ओठांवरी येई हसू - आतून ऱडल्यासारखे !

दाही दिशा म्हणतात या -`झाले जखडल्यासारखे !!`
सोडू नको गाणे़, जरी -जगणे भरडल्यासारखे !

बघणे तुझे माझ्याकडेचोरी पकडल्यासाऱखे !
का वाटले वळणावरी पाऊल अडल्यासारखे !

आयुष्य संपू लागले...वाया दवडल्यासारखे !
बरसायच्या आधीच का वाटे उघडल्यासारखे ?

देहावरी या बंधने...मनही मुरडल्यासारखे !
स्मित गूढ आहे का तुझे अर्थात दडल्यासारखे !

वागून वागावे कसे...?काही न घडल्यासाऱखे !
लिहिलेस माझे नाव तूतेही घुसडल्यासारखे !

होऊन मी बोलू किती ? माझेच नडल्यासारखे !
आठ्या कपाळी़... ओठही -होते दुमडल्यासारखे !

माझे-तुझे नाते जणू दुखणे रखडल्यासाऱखे !

कवी- प्रदीप कुलकर्णी

Wednesday, May 14, 2008

का ?

ओणवी झालीस तू हलकेच,
अन देह माझा चांदण्याने झाकला...
आंधळा अंधार मी...माझ्यावारी --
पौर्णिमेचा चंद्र का हा वाकला ?
व्यर्थ वणवणशील तू माझ्यासवे ,
भान याचेही तुला नाही जरा...
मी असा वारा...कुठेही हिंडतो...
शोधसी माझ्यात का तू आसरा ?
जन्म हा साराच काटेरी जरी,
स्पर्श तू केलास अन् झाली फुले...
आग आहे अंतरी; बाहेर ही --
पारिजाताची डहाळी का झुले ?
वेळ भेटीची चुकीची आपली...
वाट आहे वेगळी माझी-तुझी,
जाणिवांना आपल्या सारे दिसे...
प्रीत का ही आंधळी माझी-तुझी ?
मीच माझ्यातून निसटू पाहतो
आणि तू माझ्यात मिसळू पाहसी...
खूप झाले...अर्पिली काही पळे...
जन्म का साराच उधळू पाहसी ?
जाळती आतून- बाहेरून या,
काहिलीच्या, तल्खलीच्या वेदना....
फाटक्या माझ्या जिण्याला ही अशी,
लाभली का भर्जरी संवेदना ?

कवि : प्रदीप कुलकर्णी

Tuesday, May 13, 2008

माझ्या चारोल्या........

'ध्यानिमनी' नसताना,
तुझा विरह स्पष्ट आहे,
अशी कशी हि,
'एका लग्नाची गोष्ट' आहे ?....सुवर्णा

तु दिलेली कली,
अजून मी जपली आहे,
आपली तीं मैत्री आता,
जुन्या पुस्तकात लपली आहे !! ....सुवर्णा
कुणास कळते ह्रदयाची कळ?
अपुले आपण असतो केवळ..
असे कसे हे अपुले नाते..
मला घाव अन् तुला कसे वळ?
कुठून आणू उसने मागुन,
पुन्हा पुन्हा मी जगण्याचे बळ?
कितीक द्यावी स्पष्टीकरणे..
कितीक आपण काढावा पळ ?
तुला भेटुनी खरेच पटले....
उगीच नव्हती माझी तळमळ....
तुला बिलगुनी आला वारा....
इथे अचानक सुटला दरवळ !!