Tuesday, November 24, 2009

मैफल आठवांची......

हि दाटी भावनांची..
हि जखम वेडया फुलांची...
अन शपथ त्या भोगलेल्या वादळांची....
मज पुन्हा पुन्हा उर्मी देते,सजवाया मैफल आठवांची..... सुवर्णा(२००९)


पाउसगाणे.....

थेंबा थेंबातून ऐकु येतो नाद
सरींसवे कोसळतात आठवणींचे वाद,
वेड लावतो चिंब मनाला मंद मंद मृदगंध,
पाउसगाण्यासोबत होते वेडे मन बेधुंद......... सुवर्णा(२००९)

Monday, November 23, 2009

एक 'सोच ' ने तो हमें सोचने पर मजबूर कर दिया,

हम भूले तो कभी नही थे......

आपने फ़िर एक बार 'उन यादों ' में....

जीने को मजबूर कर दिया....सुवर्णा(200९)

" श्रावणसरीं......"

रिमझिम श्रावणसरींमधे,
मन तुझ्याच आठवणींमधे दंग आहे,
मनात रुजलेल्या कंच हिरवाईला,
फक्त आणि फक्त हिरवाच रंग आहे,

ओलेत्या पानापानाला,
चिंब पाखरांचा संग आहे,
रानफुलांच्या सुगंधी सोबतीला,
धुंद मृदगंध आहे....

मिटलेल्या पापण्यांत,
सुखस्वप्नांची गर्दि आहे,
प्रत्येक गोड आठवणीला,
रेंगाळण्याची वर्दि आहे....

अन इतक्यात.....
सरींच्या शिडकाव्याने अंग सारं शहारलं....
मिटल्या पापण्या उघडताच नाजुक मन थरारलं.....

कारण तेव्हाच कळून चुकलं,वास्तव समोर उभं ठाकलं....
कि हा तर केवळ भास आहे.......

मला मात्र आजहि याच श्रावणसरींसोबत पुन्हा एकदा,
तुझ्या परतून येण्याची आस आहे ...............सुवर्णा

********************************************************
कविता कशी वाटली याविषयी आपला अभिप्राय़ जरुर कळवावा.

Tuesday, January 27, 2009

मोगर्याचे रान.....
अंतरातल्या मोगर्याचे रान माझ्या,

आता फक्त सुगंधाने भरुन जावे.....

आसवांची शान आणि वेगळे ते दुःख आता,

ओठांवरुनी फक्त हासु बनुन वहावे........ सुवर्णा (जानेवारी २००९)

************************************************************

निरोप..
आपण परत कधी 'तसं' भेटणार नाही,
याच खरंतर खूप वाईट वाटलं..
अन् निरोपाच्या स्मितहास्यासोबत,
डोळ्यात माझ्या विरहाचं पाणी दाटलं......सुवर्णा (जानेवारी २००९)

तुझ्या विरहात मन माझ आजही कळवळत आहे,

पण सावरणार आहे मी स्वत:ला,

कारण तु फुलवलेलं फुल आता,

माझ्या अंगणात दरवळत आहे......सु्वर्णा (ओक्टबर २००६)

Friday, December 19, 2008

सावर रे.....

एखादया व्यक्तिच्या आयुष्यातली अतिशय जवळची व्यक्ति,त्यातल्या त्यात आयुष्याचा जोडीदार अगदी अचानक अनपेक्षितपणे ह्या जगातुन कायमची निघून जाते....जाणारी व्यक्ति जाते, कुठे जात असेल कोणास काहीच माहीत नाही. ते बेजान शरीर एकदा संपल..संपवल कि त्या व्यक्तिचं अस्तित्व काय असत,कुठे असत कोणास ठाऊक ? असत कि नसत तेहि नाही सांगता येत. पण अशावेळी एक क्रुर,कटू सत्य मात्र अस्तित्वात असत आणि ते म्हणजे त्या व्यक्तिच्या जवळच ते जितजागतं जिवंत माणुस. ज्याच आयुष्य नुसतच बदलून जात नाही,तर पुर्णपणे ढवळून निघतं. उलटपालटं होऊन जातं. एक,दोन.....पाच,दहा.... वर्षामागून वर्ष निघून जातात.....ते स्वत:ला सावरतात,सावरण्याचा प्रयत्न करतात,किंवा निदान तस वरवर तरी दाखवतात. पण मधूनमधून काही प्रसंग घडतात,काही इतर लोक बोलतात....जखमेवरची खपली पुन्हा पुन्हा ओरबाडली जाते, आणि काहि काळापुरती का होईना ती जखम पुन्हा अगदी तशीच भळभळते....
मन सैरभैर होतं. पण काहीही ईलाज नसतो. नव्याने पुन्हा उभं रहावं लागत,स्वत:च स्वत:ला सावराव लागतं,समजवावं लागतं…..
इथे मग जाणारी व्यक्ती नैसर्गिकपणे गेली की अनैसर्गिकपणे, यावर बरच काही अवलंबून असतं. नैसर्गिकपणे गेली असेल तर मग मनात सारखे विचार येतात, प्रश्नच प्रश्न, माझ्याशीच अस का व्हावं ? मतभेद ,कुरबूरी तर सगळ्याच नात्यांमधे,कुटुंबांमधे असतात,पण या सगळ्यांसोबतही एकंदरीत आयुष्य तस चांगल चाललं होत ना,मग अस अचानक आपल्याच बाबतीत का घडावं ? आयुष्यभरची साथसोबत करण्याची आणि अशीच काही बरोबरीने पहिलेली असंख्य स्वप्न अशी का भंगावीत ? नशीबच वाईट आहे का माझं की आणखी काही…..? ईतरांच सगळं सुरळितपणे चालू असताना माझ्याच बाबतीत असं का? मीच का ? एवढा माझा काय गुन्हा की माझा सुखावर काही आधिकारच नाही का?फक्त प्रश्नच प्रश्न ??
उत्तर मात्र सगळी अस्पष्ट,धूसर,संन्दिग्ध….सगळ्यात मोठा प्रश्न,एवढी मोठी माझी काय चूक होती ?
आता हेच अनैसर्गिकपणे जर जोडीदार गेला, मग तर सारं आणखीच अवघड होऊन बसत. समाजाच्या त्या विचित्र नजरा, लोकांच्या चेहर्य़ांवरचे प्रश्न,कधीकधी टोमणे, अवहेलना....सगळच असह्य. अशावेळी वाटतं मला वेळीच जाणवल का नाही की काहीतरी बिनसतय, की जाणवूनही मी तिकडे दुर्लक्ष केल? यावर वेळीच काही तोडगा काढला असता तर एवढं गंभीर काही घडलच नसत कदाचित... माझी चूक होती की जोडीदाराची ? मग ती चूक एवढी मोठी होती का? कशालाच काही अर्थ उरत नाही……उरत फक्त एकटेपण, क्षणोक्षणी खायला उठणारं.... आजूबाजूला असतात सगळे,पण त्या गर्दितही ती व्यक्ती एकटी पडते,अगदी एकटी……याहीपुढे त्यांची मुलं असतील मग तर आणखीच कठीण परीक्षा. निष्पाप मुलांना सत्य परिस्थिती सांगण्यापासून ते त्यांच्या अगणित प्रश्नांना समाधानकारक उत्तरं देण्यापर्यंत सगळ कसं असेल ते जे अशा प्रसंगांतून जातात त्यांनाच माहीत….
पण हो हो हो….ही झाली अशा प्रसंगांतून समोर आलेली काळी, निगेटिव बाजू. ह्या नाण्यालाही निश्चितच दूसरी जमेची बाजू असतेच की. खरंच काळ ह्या सगळयावर औषध ठरतो आणि मग हळूहळू का होईना ही बाजूही प्रकाशून निघते.किंबहूना आधिकच चमकायला लागते…. मला वाटत तुलनेनं कमी वयात अशा प्रसंगांतून गेलेली माणसं आयुष्यात काहीशी लवकर प्रगल्भ होतात. अशावेळी खरं तर जगाची,आजूबाजूच्या माणसांची खरिखूरी ओळख होते. कोण खरोखरच आपलं, मनापासून आपल्यासाठी आहे हेही कळत आणि कोण फक्त स्वार्थासाठी आजूबाजूला घोटाळत होते तेही कळत. कोणाला आपण किती आणि कशासाठी हवे होतो आहोत हेही प्रकर्षानं जाणवत. कधीकधी म्हणण्यापेक्षा जास्त सहवासात असल्याने नेहमीच थोडस टाळलेल्या किंवा गृहीत धरलेल्या व्यक्तींच,जोडीदाराच,आपल्या जीवनातल महत्व, गरज किंवा जरूरी अगदी मनापासून जाणवते. नकळत आपण जवळच्या सगळ्याच व्यक्तींना पहिल्यापेक्षा जरा जास्तच जपायला लागतो. त्यांच्या अगदी छोटयाश्या चूकांवरून वाद घालणारे आपण प्रसंगी तुलनेनं मोठया चूकाही पोटात घालायला शिकतो, आणि त्यांना कधी कधी समजही देतो तीही तटस्थतेनं,एका वेगळ्याच प्रगल्भतेनं. थोडक्यात काय तर अशा प्रसंगांनंतर आपण स्वत:लाही आणि इतरांनाही सहज माफ करायला शिकतो. जीवनाकडे बघण्याचा आपला दृष्टीकोनच बदलून जातो. पुर्वी फक्त स्वत:पूरतच मर्यादित जग ठरवून ठेवणारे आपण,आपल सो काल्ड सुरक्षित कवच विस्तारतो ते ईतरांनाही शक्य तितक सामावून घेण्यासाठी...... माझा जोडीदार, माझी मूलं, माझं कुटुंब एवढयाचपुरता विचार करणारी अशी व्यक्ती दुसर्यांच्या मुलांनाही स्वत:च्या मुलांप्रमाणेच,किंबहुना कांकणभर आधिकच प्रेम,माया देण्याची शक्ति किंवा ईच्छाशक्ति मिळवते ती अशाच प्रसंगांतून. आणि मग आयुष्यात पुढे पुन्हा जोडीदार स्वीकारण्याचा प्रयत्न केला तर मग ते नातं खरोखरीच प्रगल्भ आणि सार्थ,परिपुर्ण अस बनतं. निदान ते तसं बनवण्याचा मनापासून प्रयत्न तरी होतो हेही नसे थोडके….…..

सुवर्णा ( २९ / ०८ / २००८)